अतिवृष्टी कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी 1077 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधासांगली: आंध्रप्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा हा तेलंगणा राज्यातील खम्माम व आंध्रप्रदेश येथील काकीनाडा किनारपट्टीवर प्रवेश करणार आहे. या परिस्थितीमुळे दिनांक 13 ते 14 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रामध्ये दि. 13 ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस व दि. 14 ऑक्टोबर रोजी अत्यंत मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या कालावधीत सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

 मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पाऊस पडत असताना, विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रीक वस्तूपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी 1077 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधावा. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सुत्राकडून करून घ्यावी. अतिवृष्टी होत असताना कोणीही नदी नाला इत्यादी ठिकाणी प्रवेश करू नये. पूराच्या पाण्यात नागरिकांनी सेल्फी काढू नये. DAMINI Lighetening Alert हे ॲप आपल्या क्षेत्रात पडणाऱ्या आगाऊ वीजपडीची माहिती देते. तसेच वीजपडीपासून संरक्षण करावयाच्या उपाय योजनांची माहिती देते. तरी हे ॲप प्ले स्टोर वरून डाऊनलोक करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments