भिवर्गी ते कर्जगी मार्गावरील बोरनदी पात्रात तरुण गेला वाहून


जत/प्रतिनिधी: तालुक्यातील भिवर्गी ते करजगी मार्गावरून दुधाची वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने पिंटू भिमू धायगुडे (वय 32, रा.सनमडी ता.जत) हा पाण्यात वाहून गेल्याची घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.


तालुक्यात गेल्या चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्व ओढे, नाले व नद्या दुतोंडी भरून वाहत आहेत. पूर्व भागातील संख प्रकल्प भरून सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने बोर नदीला पूर आला आहे. दरम्यान भिवर्गी-करजगी मार्गावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.


आज सकाळी सनमडी परिसरात संकलन केलेले दुध करजगी येथील चेन्नई डेअरीला घालण्यासाठी टेम्पो ऐवजी ट्रैक्टर मधून दोघेजण चालले होते. ट्रॅक्टर उंच असल्याने पाण्यातून जाईल या उद्देशाने चालकाने ओढापात्रातील पुलावरून दुधाचे रिकामे कँन भरलेला ट्रॅक्टर घातला. मात्र पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने चालकास ट्रॅक्टर आवरता आला नसल्याने ट्रॅक्टर वाहून नदीपात्रत कोसळला. या घटनेत त्यातील एकाने उडी मारल्याने जवळच्या काही लोंकानी त्याला वाचविले. मात्र अन्य एकजण वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दरम्यान वाहून गेलेल्याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर पुलावरील वाहतुक स्थानिक प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments